कर्करोगाशी लढण्यासाठी सर्वांनी सज्ज झाले तर विजय निश्चित, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या लोकार्पण प्रसंगी मोहन भागवत यांचे उद्गार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट अर्थात एनसीआयचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच उद्योजक गौतम अदानी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली. विदर्भाच्या परिसरात सुरू झालेले हे कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यास मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले, “स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे यात खूप फरक आहे. पण निर्धार पक्का असेल तर तो पूर्ण होतो आणि टीम तयार करून काम केलं तर ते लवकर पूर्ण होईल. संघ स्वयंसेवक असं कार्य करतात तेव्हा खूप बरं वाटतं.

पाटण्यातील विमान अपघाताचा संदर्भ देत मोहन भागवत यांनी तिथं स्वयंसेवकांनी कसं काम केलं ते सांगितलं. त्याचं कौतुक झालं. मला आवडलं. या प्रकल्पाच्या मागे संघ उभा असल्याचे भागवत म्हणाले. इथे गरिबांची सेवा केली जाईल. उत्कृष्ट उपचार मिळेल. संघ चांगले काम करत असून यापुढील काळातही असंच सुरू राहावं, असं ते म्हणाले.

जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं भागवत म्हणाले. उपचार स्वस्त करावे लागतील. पण ज्यांची क्षमता नाही त्यांनी मोफत उपचार करावेत पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी पैसे द्यावेत आणि ज्यांना मदत करता येईल त्यांनी हात पुढे करावा. इतर पद्धतींचा वापर करून उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.

मोहन भागवत म्हणाले की, कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी सर्वांनी सज्ज झाले तर विजय निश्चित आहे. शेवटी भागवत यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणाही केली.

नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महत्त्व काय?

कर्करोगाच्या उपचारासाठी जागतिक दर्जाची वैद्यकीय सोय
470 बेडचे कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर ट्रीटमेंट युनिट
10 अद्ययावत ऑपरेशन थिएटर
ओन्कॉलॉजी आयसीयू असलेलं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय
धर्मादाय पद्धतीने कार्य करणारं देशातील सर्वात मोठा कॅन्सर रुग्णालय
लहान मुलांवर सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार देणारं मध्य भारतातील एकमेव रुग्णालय
लवकरच बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनिट कार्यरत होणार
कर्करोगाच्या उपचारातील नवीन न्युक्लियर मेडिसिन थेरेपी, आयोडिन थेरेपीसाठी वेगळे 10 बेड, अशी सोय मोजक्याच ठिकाणी
2017 पासून आजवर टप्प्याटप्प्यात एनसीआयमध्ये कर्करोगाच्या विविध रुग्णांवरील उपचारांची आकडेवारी