बंगालच्या उपसागरात झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत पाऊस थैमान घालत आहे. समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा 40च्या पुढे गेला आहे. तर राज्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून ते 4 मेपर्यंत देशभरात जोरदार पाऊस होणार आहे. खासकरून उत्तर भारताकडे सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे आधीच अवकाळीची धास्ती धरून बसलेल्या शेतकऱ्यांचं आणखीच टेन्शन वाढणार आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. विदर्भात तर सरासरीपेक्षा कमाल तापमानात चार ते नऊ अंशांनी घट झाली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
