राज्यात बदल घडला नसता तर राष्ट्रवादीचा शिवसेना संपवण्याचा प्लॅन यशस्वी झाला असता-दीपक केसरकर

मविआची सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. आता तरी लोकांची खात्री पटली असेल की राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्लॅन केला होता. त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर आमचे मुख्यमंत्री चालत आहेत. हा राज्यात बदल घडला नसता तर युती पुन्हा आली नसती आणि शिवसेना संपवण्याचा जो प्लॅन होता तो यशस्वी झाला असता, असं वक्तव केसरकर यांनी केले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी बारसू प्रकल्पावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. हा प्रकल्प व्हावा याची मागणी त्यांनी लेखी स्वरूपात केली होती. लोकांना संघर्ष करायला लावायचा याच्यातून राजकारण होत असेल तर ते महाराष्ट्राच्या परंपरेला धरून नाही. हेच राजकारण समृद्धी महामार्गाच्या बाबतीत झालं. मेट्रो प्रकल्पाच्या बाबतीत झालं आहे. शेवटी जनतेनेच आता सज्ज झालं पाहिजे कारण हा विरोध राजकीय कारणातून केला जात असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.