अजित पवारांच्या मनात काय?4 दिवसात कळेल – संजय शिरसाट

मागच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. राजकीय वर्तुळात सातत्याने हा विषय चर्चेत येत आहे. अशात अजित पवार यांनी स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच असणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं. पण अजित पवार भाजपसोबत येतील, असा दावा युतीकडून केला जात आहे. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अजित पवार चार दिवसात मोठा निर्णय घेतील असं म्हटलं आहे. तसंच आज महाविकास आघाडीची मुंबईत वज्रमूठ सभा होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर होणाऱ्या या सभेवरही शिरसाट यांनी टीका केली आहे.

मुंबईत आज होणाऱ्या वज्रमूठ सभेवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, या सभेत अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहित नाही. तसेच अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहीत नाही. पण या सभेत अजित पवार शरीराने असतील मात्र मनापासून सभेत नसणार आहे. ते मनातून कुठे असतील याबाबत 4 दिवसांत कळेल आणि सगळ्यांना दिसेल. अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहे. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे आणि ते निर्णय शंभर टक्के घेतील.

या पूर्वी सुद्धा बीकेसी मैदानावर बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतल्या आहेत. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. 3 पक्ष येऊन आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. पण या तिन्ही पक्षांच्या सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलतंय, हा समज चुकीचा आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत.

संजय शिरसाट यांच्या या विधानामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार भारतीय जनता पक्षात जाणार कि राष्ट्रवादीमध्येच राहणार या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.