राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्राचं आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात कुठे अजित पवार कधी सुप्रिया सुळे तर कधी जयंत पाटील यांच्या नावानं भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हे सर्व सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार आहे.
त्यावर भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, ‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ते असे वक्तव्ये करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास भरण्याचं काम करत आहेत.’ अशी प्रतिक्रिया विखे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या विधानावर केली आहे.
तत्पूर्वी अलीकडेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे उरलेले १३ आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचे २० आमदार शिंदे यांच्या संपर्कात आहेत, अशीही चर्चा आहे, असं म्हटलं होत.
तसेच काँग्रेसचे मोठे नेते महाबळेश्वरमध्ये शिंदेंना भेटले अशीही चर्चा असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार फुटतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं.
उदय सामानात यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांनीही त्यांना टोला लगावत मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “संपर्कात सगळेच एकमेकांशी असतात, तसं एकनाथ शिंदे हे माझ्या संपर्कात आहेत. त्यामुळेच उदय सामंत म्हणतात, ते काही खोटं नाही.”
