वज्रमूठ घराणेशाहीची, फक्त ठाकरे कुटुंबाची, जाहिरातीतही कोणाला स्थान नाही!

मुंबई : पूर्वाश्रमीची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची मालमत्ता असल्याप्रमाणे चालविली होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांना बेदखल केले हा अनुभव आहेच. मात्र अद्यापही उरली सुरली शिवसेना म्हटला जाणारा ठाकरे गट त्याच पद्धतीने चालविला जात. आहे. आता तर जाहिरातीतही इतर नेत्यांना स्थान मिळेनासे झाले आहे.

कामगारदिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त भारतीय कामगार सेनेच्या वतीने ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकात जाहिरात देण्यात आली आहे. वज्रमूठ कामगार हिताची, महाराष्ट्र धर्माची अशा आशयाच्या या जाहिरातीत तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत. धक्कादायक म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सर्वात शेवटी आहे. पाचही जणांचे फोटो सारख्याच आकारात आहेत.

ठाकरे गटामध्ये सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, संजय राऊत यांच्यासारखे अनेक नेते आहेत. मात्र कोणालाही या जाहिरातीत स्थान देण्यात आलेले नाही. स्व. दत्ताजी साळवी यांनी भारतीय कामगार सेनेची स्थापना केली. विद्यमान अध्यक्ष अरविंद सावंत यांना त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचीही आठवण राहिलेली नाही.

इतर नेत्यांना डावलले जात असताना तेजस आणि रश्मी ठाकरे यांच्या फोटोचे प्रयोजन काय असा सवालही केला जात आहे. याचा अर्थ ठाकरे गट केवळ एका कुटुंबाचा पक्ष राहिला आहे का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.