सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांमध्ये केनान शुगर कंपनी लि. मध्ये कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० नागरिकांशी जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्याशी संपर्क ठेवून आहे. येथील सर्व नागरिक सुखरूप असून भारत सरकारच्या ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुमारे ९५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परत आलेली आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील ७ नागरिकांचा समावेश आहे. सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी व त्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करून त्यावर अधिकाऱ्यांची नियुक्तीही जिल्हा प्रशासनाने केली आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी कार्यालय सध्या सुदानमधील केनाना शुगर कंपनी लि.मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय प्रवासी गटा सोबत संपर्कात आहे. येथे साधारण ४०० भारतीय नागरिक कार्यरत असतात आणि त्यापैकी १०० ते १२० नागरिक हे सांगली जिल्ह्याचे आहेत असे कळते. नागरिकांनी स्थलांतराच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि केनाना साखर कारखान्याच्या साईटवरून पोर्ट सुदान आणि पुढे त्यांच्या सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी भारतीय दूतावासाला केली आहे.
आज सायंकाळी दुसरी बॅच सुदानमधून बाहेर पडत असून त्यात जिल्ह्यातील १५ ते २० नागरिकांचा समावेश असेल. जवळपास ४०० पैकी ३०० नागरिक सुदानमधून बाहेर पडणार असून ७० ते ७५ नागरिक स्वत:च्या जबाबदारीवर सुदानमध्येच राहण्याच्या तयारीत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने संपर्क ठेवत दिलेला धीर व केलेल्या मदतीबद्दल यावेळी त्यांनी अत्यंत कृतज्ञता व्यक्त केली.
