माझा सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु? प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार – उद्धव ठाकरे

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. यासंदर्भात उद्धव ठाकरेंची कोणतीही प्रतिक्रिया कालपासून समोर आली नव्हती. अखेर आज दुपारी मातोश्रीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, उद्या अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडेही लक्ष असल्याचं ते म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, त्यांना अधिकार आहे काय करायचं. पवार सगळ्यांच्या हिताचा निर्णय घेतील. मी शरद पवार यांना सल्ला कसा देऊ? माझा सल्ला पवारांना पचनी पडला नाही तर मी काय करु? असा सवाल उपस्थित केला. पवारांच्या निवृत्तीचा निर्णय अंतिम निर्णय नाही.

महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन. तसं मी काही बोलणार नाही किंवा करणार नाही. पण मी असंही म्हणेन, की देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी असही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणं आपल्याला आवडलं नसल्याचा उल्लेख शरद पवारांनी त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात केल्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. “प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून काय केलं हे जगजाहीर आहे. प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.