बेळगाव कर्नाटकच्या घशात घालण्याची शरद पवारांनी केली होती पूर्ण तयारी, शिवसेनेचाही होता पाठिंबा

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट उच्च रवात बोलत असले तरी शरद पवार यांनी आलो बेळगाव कर्नाटकच्या घशात घालण्याची पूर्ण तयारी केली होती. विशेष म्हणजे तत्कालीन शिवसेनेने त्याला पाठिंबा दिला होता. लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शरद पवार यांनीच बेळगाव कर्नाटकच्या घशात घालण्याचा कसा डाव आखला होता आणि लुटूपुटुचा विरोध दाखवत शिवसेनेनेही त्याला पाठिंबा दिला होता असे शरद पवार यांनीच सांगितले होते.

शरद पवार म्हणतात, प्रश्न भिजत पडण्यापेक्षा त्यावर सर्वमान्य आणि किमान समाधानकारक तोडगा काढायला हवा. सीमावादावर एक तोडगा मी सुचवला होता. बेळगाव महाराष्ट्राला मिळायला हवं, ही आपली इच्छा होती आणि आहे. तिथल्या मराठी माणसालाही महाराष्ट्रात येण्याची तीव्र इच्छा आहे. त्या दृष्टीनं मी ‘न्यू बेळगाव’चा प्रस्ताव मांडला होता. योजना अशी, की महाराष्ट्राच्या हद्दीत कर्नाटक सीमेपासून चौदा किलोमीटर अंतरावर सिडकोनं एक उपनगर विकसित करावं. तिथे मराठी शिक्षणाची सोय करावी, राज्याच्या सर्व योजना इथे राहणाऱ्यांना लागू कराव्यात. मराठी माणसांनी त्यांचा व्यापार उदीम, नोकऱ्या बेळगावात करायला हरकत नाही. बेळगावमधली त्यांची निवासस्थानं न सोडताही त्यांना महाराष्ट्रात स्थायिक होण्याची संधी देणारी ही योजना होती. मराठीशी त्यांची नाळ राहावी आणि महाराष्ट्रात राहण्याची भावना प्रत्यक्षात यावी, या दृष्टीनं योजना आखली होती.

या प्रस्तावाला महाराष्ट्रातल्या बहुसंख्य नेत्यांनी पाठिंबा दिला होता असेही पवारांनी म्हटले आहे. मात्र फार गवगवा न करता, योजना अमलात आणा, असा त्यांचा आग्रह होता. अगदी शिवसेनेलाही हा प्रस्ताव मान्य असला, तरी त्याला जाहीरपणे मात्र विरोधच करणार, असं त्या वेळी मनोहर जोशी यांनी शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट केलं होतं. याच्या विरोधात सूर फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांचा होता. ‘आम्हाला ‘मोडकंतोडकं बेळगाव नको,’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती, असे पवार यांनी म्हटले आहे.