मुख्यमंत्री – रश्मी ठाकरे भेटीचा श्रीकांत शिंदेंकडून इन्कार; खोटे वृत्त पसरवणाऱ्या विरुद्ध पोलिसात तक्रार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे भेटल्याचे निराधार आणि धादांत खोटे आहे. अशी कोणतीही भेट झालेली नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. याबाबत पोलिसातही तक्रार करणार असल्याची खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या काही वृत्तवाहिन्यांनी दिल्याने राजकारणात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वी दोघे एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे सूत्रांच्या हवाल्याने म्हटले होते. मात्र, या भेटीच्या बातम्या धादांत खोट्या असून अशी कोणतीच भेट झालेली नाही, अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे वृत्तांकन करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी त्याची सत्यता पडताळायला हवी. उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे माध्यमांकडून अपेक्षित नाही.

आम्ही याबाबत ट्विटर आणि पोलिसांकडे तक्रार करणार आहोत. अनेक अकाऊट जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवतात. हे थांबवण्याची गरज आहे. मुंबई पोलिसांनी खोट्या बातम्या पसरविल्याची दखल घ्यावी. गुप्त बैठकांबद्दल निराधार दावे केले जात आहेत. कारवाईसाठी या खोट्या बातम्यांचे स्रोत तपासा. ही बेजबाबदार पत्रकारिता असून चौकशीची गरज आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आमदारांसह बाहेर पडले. भाजपसोबत सरकार स्थापन करून मुख्यमंत्री बनले. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटात कमालीचे वितुष्ट आले होते. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते. अशा परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबातीलच सदस्यांनी शिंदे यांची भेट घेण्याचे वृत्त खळबळजनक आहे.