प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत.
मेअखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.
‘नमो शेतकरी’ योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये मिळतात. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या ६ हजार रुपयांमध्ये आणखी ६ हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे, अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.
पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी माहिती कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.
