महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे – नाना पटोले

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस स्नेहल जगताप यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. महाडमध्ये शनिवारी (६ मे) शिवगर्जना सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटाच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत स्नेहल जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु ठाकरे गटाने जगताप यांना पक्षात प्रवेश दिल्याने महाविकास आघाडीतला ठाकरे गटाचा मित्रपक्ष असलेला काँग्रेस पक्ष मात्र उद्धव ठाकरेंवर नाराज आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याबाबत म्हणाले, आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की हे करू नका. पण तरी त्यांनी केलं. स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला. अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या पक्षाला कमजोर करण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. महाविकास आघाडीची जेव्हा चर्चा होईल तेव्हा हा मुद्दा उपस्थित केला जाईल. महाडची जागा काँग्रेसची आहे आणि आम्ही ती जागा लढणार आहोत.

स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या असून त्यांनी महाडचे नगराध्यक्षपदही सांभाळले आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर नुकत्याच महाड येथील ठाकरेंच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. इतकेच नाही तर स्नेहल जगताप यांच्यासोबत काँग्रेसचे हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ यांनीही ठाकरे गटात प्रवेश घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला.

सध्या महाड येथे आमदार भरत गोगावले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. पूर्वी ठाकरेंसोबत असलेल्या भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांना पाठिंबा देत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला. त्यामुळे याठिकाणी ठाकरे गटाची ताकद कमकुवत झाली आहे. अशावेळी स्नेहल जगात यांना पक्षात घेत उद्धव ठाकरेंनी गोगावलेंविरोधात रणनीती आखत स्नेहल जगतापांना मविआकडून उमेदवारी देण्याचे संकेत दिले आहेत. त्यात आता नाना पटोलेंनीही त्याठिकाणी काँग्रेस जागा लढवेल असं सांगितल्याने महाडच्या जागेवर २ पक्षांनी दावा केला आहे.