केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे.
यापैकी काहीजण अद्याप देखील बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्या या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्या सुरू केले आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. दरम्यान केरळ दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी रात्रीच तातडीने आपत्कालीन बैठक बोलावली. अधिकाऱ्यांना तातडीने जखमींवर उपचार करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले आहेत.
ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम इथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झाला. मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणं नसल्याचंही बोललं जात आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. जखमींवर तज्ज्ञांकडून तातडीने उपचार मिळावेत आणि शवविच्छेदन प्रक्रियाही जलद व्हावी, जेणेकरुन मृतदेह लवकरात लवकर नातेवाईकांच्या ताब्यात देता येतील, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
