‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी काही जण करत आहेत. तर काहींनी मात्र या चित्रपटाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘द केरला स्टोरी’ समर्थनार्थ एक ट्वीट केले आहे. त्यांनी चित्रपटावर टीका करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटावर जशी बंदीची मागणी अयोग्य होती तशीच या चित्रपटाबाबत केली जाणारी मागणी अयोग्य आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.
शबाना आझमी यांनी ‘द केरला स्टोरी’ला पाठिंबा देणारे ट्वीट केले आहेत. ‘जे लोक द केरला स्टोरीवर बंदी घालण्याची चर्चा करतात ते आमिर खानच्या लाल सिंग चड्ढावर बंदी घालू पाहणाऱ्यां इतकेच चुकीचे आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एकदा चित्रपट पास केला की, तर कोणालाच एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी होण्याचा अधिकार नाही’ असे शबाना आझमींनी म्हटले आहे. त्यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे. काही लोक या चित्रपटाचं कौतुक करत आहेत, तर काही लोक या चित्रपटाला विरोध करत आहेत.
दरम्यान, चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी काहींनी कोर्टातही धाव घेतली होती. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने त्यावर बंदी घालण्यास नकार दिला. त्यानंतर या चित्रपटाचं समर्थन करणारे व विरोध करणारे असे दोन गट दिसत आहेत. काहींच्या मते, चित्रपटात अतिशयोक्ती दाखवण्यात आली आहे आणि चित्रपट समाजाला भडकवण्याचे काम करतो. तर, काहींच्या मते हा चित्रपट देशातील महिलांसाठी महत्त्वाचा आहे.
