आयएल आणि एफएस प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. चौकशीसाठी सोमवारी (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीमधून देण्यात आले आहेत. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी काल (11 मे) ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत वाढवून घेतली आहे.
दरम्यान ईडीची नोटीस मिळाल्यानंतर जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मी ज्या पद्धतीने राज्यात वावरतो बोलतो याची पूर्ण जाणीव जनतेला आहे. जनतेला कोणत्या प्रकारचे लोक काय करू शकतात याची कल्पना आहे. त्यामुळे मला चिंता वाटत नाही.
आयएल अॅंड एएसकडून एका कंपनीने कर्ज घेतलं होत. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे. याच कारणामुळे त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. या कंपनीने 2019 मध्ये दिवाळखोरी जाहीर केली होती. तर लोकांच्या पैशांचं मनि लॉन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. तर याच प्रकरणात राज ठाकरे यांची देखील चौकशी झाली होती.
मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया काल माध्यमांना दिली होती.
