राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा तडाखा तर कधी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. सध्या राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढला आहे. आर्द्रतायुक्त आणि गरम हवेमुळं पुढील तीन दिवस म्हणजे (14 मे पर्यंत) मुंबईसह संपूर्ण कोकणात उष्णतेमुळं अस्वस्थता जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उन्हाचा पारा वाढला आहे. नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये 5 ते 7 अंशांची वाढ झाली आहे. तर आता हा पारा चाळीशी पार जाणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.
पुणे शहरात मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस होता. त्यामुळे तापमान ३५ अंशांच्या जवळपास होते. परंतु दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणात बदल होत आहे. ११ मे रोजी पुणे शहरातील कमाल तापमानाने नवा उच्चांक गाठला आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात तापमान थेट 44.4 अंश सेल्सिअसवर गेले आहे. यामुळे असह्य करणारा उन्हाचा चटका सध्या पुणेकरांना बसत आहे. सकाळी नऊ वाजेनंतर चटका देणारे ऊन जाणवू लागत आहे. त्यानंतर दुपारी 12 नंतर चटका आणखी वाढत आहे. यामुळे दुपारी रस्तेही ओस पडत आहेत.
बंगालच्या उपसागरात बदल होत आहे. याठिकाणी मोचा वादळ सक्रीय झाले आहे. त्यामुळे अवकाळी पडणारा पाऊस जाऊन राज्यातील कमाल तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 44.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली.पुढील 72 तासांत यंदाच्या वर्षातील सर्वात उच्चांकी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
