राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक शहरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली होती. मात्र पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दर्शवला आहे. विदर्भात येलो अलर्टदेखील जारी केला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस उष्णतेपासून बचाव करण्याचं आवाहन वेधशाळेकडून करण्यात आला आहे. सकाळी 11 पासून दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वाधिक तापमान असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मोसमी पाऊस राज्यात दाखल होईपर्यंत विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागणार आहे. समुद्रनकिनारा नजीक असलेल्या भागातील नागरिकांना हवेत आर्द्रतेचं प्रमाण असल्यामुळे उकाडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी मान्सूनचे वारे वेळेच्या आधीच अंदमानात दाखल झाला. ज्यानंतर हे वारे गुरुवारी अरबी समुद्राच्या रोखानं प्रवास करू लागले. पुढच्या एका दिवसातच वाऱ्यांनी आणखी वेग घेतला ज्यामुळं आता अवघ्या काही तासातच मान्सून केरळात दाखल होणार आहे. पुढे 5 जूनला तो कर्नाटक, आंध्रप्रदेशच्या दिशेनं जाईल. मजल दरमजल करत हा मान्सून 10 जूनपर्यं महाराष्ट्रासह तेलंगणात दाखल होणार आहे.
देशातील हवामानात सतत चढ-उतार होताना दिसत आहे. कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचं तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातही वाढत्या उष्णतेमुळं नागरिक बेजार झाले आहेत. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्यानं देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका आणि भरपूर पाणी पित रहा, असं आवाहन करण्यात आलं आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे राज्यातील मध्य महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. उष्णतेत वाढ झाल्यामुळे काही ठिकाणी वादळासह पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
