ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन भाजपावर टीका केली आहे. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. त्यानंतर संजय राऊत हा भांडुपचा देवानंद आहे अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे. तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नितेश राणेंनी टीका केली आहे.
संजय राऊतांमध्ये हिंमत आहे का शरद पवार साहेबांना सांगण्याची की, बाळासाहेब ठाकरेंची मागणी होती औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा, अशी, हे शरद पवारांना सांगण्याची हिंमत आहे का संजय राऊत यांच्यामध्ये?, असं नितेश राणे म्हणालेत.राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावरही नितेश राणेंनी घणाघात केलाय. मुंब्र्याच्या आमदारांनी महाराष्ट्रात दंगली होतील असं विधान केलं होतं. दोन तीन महिन्या अगोदर जितेंद्र आव्हाडांना कसं कळलं होतं की राज्यात दंगली होणार आहेत? कोल्हापूरच्या नेत्याला कसं कळलं की दंगल होणार आहे? आव्हाडांच्या मतदरसंघात 400 लोकांना धर्मांतर करताना पकडलं, यावर संजय राऊतांनी सामनात अग्रलेख लिहावा, असं नितेश राणे यांनी म्हटलंय.
औरंगजेबाचा मुद्दा काढला गेला आहे त्या औरंगजेबावर कुणाचं प्रेम आहे महाराष्ट्राला माहित नाही का? ज्यांना संभाजी नगर म्हणता येत नाही त्यांना संजय राऊत कधी जाब विचारणार आहेत? संजय शिरसाट, श्रीकांत शिंदे यांची नावं घेतल्यावर जो थुंकतो त्या संजय राऊतला आव्हान देतोय तू खरा मर्द असशील तर अबू आझमीने औरंगजेबला मी मानतो तो माझा नेता आहे असं वक्तव्य केलं आहे अबू आझमीचं नाव घेतल्यावर थुंकून दाखव असं आव्हान नितेश राणेंनी दिलं आहे. तसंच संजय राऊत यांचा उल्लेख भांडुपचा देवानंद असा केला आहे.
काल नंदकिशोर चतुर्वेदीच्या प्रॉपर्टीवर रेड पडल्या आहेत. मातोश्री 2 चा खरा मालक चतुर्वेदी आहे. याला ठाकरेंनी लपवले आहे. राऊतांनी अग्रलेखातून सांगावे की, चतुर्वेदींनी कुणाचे खोके ठेवले. मागच्यावेळेला जेव्हा रेड पडली होती तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मेव्हणे हे ऑस्ट्रेलियाला पळून गेले, असा आरोप राणेंनी केला.
