शरद पवारांना मी ओळखत नाही; 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही – केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार टीका केली होती. मी अजय कुमार मिश्रा यांना ओळखत नाही असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन एकदा स्वत: निवडणूक लढत दाखवावी, असे थेट आव्हान मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिले आहे.

दरम्यान, येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील ४८ मतदारसंघांत भाजपचे खासदार निवडून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाला सत्तेत येऊन नऊ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ‍मिश्रा बोलत होते.

राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मी चाळीस वर्ष दिल्लीच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळे कोण अजय मिश्रा मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य केले होते या वक्तव्याची मिश्रा यांना पत्रकारांनी आठवण करून त्यावर प्रतिक्रिया विचारलली असता ते म्हणाले प्रत्येक नेते आपापल्या पद्धतीने नेहमीच बोलत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांचा पक्ष महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे त्यांची वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायची हा सुद्धा प्रश्न आहे. जर शरद पवार मला ओळखत नसतील तर मी सुद्धा त्यांना ओळखत नाही शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघातून येऊन तेथून निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन मिश्रा यांनी दिले यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अतुल भोसले विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.

कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्राचे सरकार सक्षम आहे. या दंगली भडकविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.