आरबीआयच्या रेपो दरात बदल नाही; कर्जदारांना दिलासा कायम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कर्जदारांना दिलासा दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसून रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत. तसेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.

आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर करण्यात आले आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीकडून अपेक्षेप्रमाणे सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. रेपो रेट 6.50 टक्के कायम ठेवण्याचा आरबीआयच्या पतधोरण समितीने निर्णय घेतला आहे. मागील वर्षात 2.50 टक्क्यांनी आरबीआयनं वाढ करत रेपो रेटमध्ये बदल केले होतेय चालू आर्थिक वर्षात विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर चालू आर्थिक वर्षात महागाई दर 5.1 टक्के राहण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर वाढले, ज्याचा थेट परिणाम बँकेने ग्राहकांना दिलेल्या कर्जावर दिसून आला. बँकांनी सर्व श्रेणींच्या कर्जाचे व्याजदर वाढवले, मग ते वैयक्तिक कर्ज असो, कार लोन, गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्ज. मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकांनी देखील कर्जावरील व्याजदरात वाढ केली. पण वर्षभरात रेपो दरात वाढ होण्याचाही एक फायदा म्हणजे बँक ठेवींवरील व्याजदरात वाढ झाली. याशिवाय गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बँकांनी दीर्घ मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णयही घेतला गेला. हेच कारण आहे की यावेळी बँक एफडीवर खूप चांगले व्याजदर मिळत आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतात, ज्याचा थेट परिणाम तुमच्या ईएमआय वर होईल.