संत एकनाथ अन् तुकारामांच्या पालखीचं आज पंढरीकडे प्रस्थान

आषाढीवारी साठी देहूनगरी सज्ज झाली आहे. आज तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून हजारो वारकरी देहूनगरीत जमले आहे. विठू नामाचा जयघोष करत आज संत तुकाराम महाराजांची पालखी विठ्ठलाच्या भेटीला निघणार आहे.पंढरीच्या भेटीची आस लागून असणाऱ्या आषाढीवारीला आज पासून सुरुवात होत आहे. आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान संत देहूनगरितून होणार आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे. या साठी हजारो वारकरी हे देहूनगरीत जमले आहेत. दरम्यान, टाळ आणि मृदंगाच्या गजराने संपूर्ण देहूनगरी ही दुदुमली आहे. हा प्रस्थान सोहळा वारकरी याची देही याची डोळा बघणार आहे.

पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी 10 जून देहूतून दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत.

या पालखीचं प्रस्थान आज शनिवार 10 जून 2023 ला पैठणनगरीमधून सायंकाळी पार पडणार आहे. ही पालखी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद. आणि सोलापूर या 5 जिल्ह्यांतून जाणार आहे. पंढरपूरला जाताना या पालखीचे 19 मुक्काम होणारप आहेत. तर 28 जूनला आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरलीा पोहचणार आहे. या पालखीत जवळुपास 90 दिंड्या असणार आहेत. तर 20 हजार पेक्षा जास्त वारकरी पैठण ते पंढरपूर हा 260 किमी पायी प्रवास करणार आहेत.

ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या संगतीने पंढरीच्या वाटेवर चालण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदी आणि देहूमध्ये दाखल झाल्या आहेत. आळंदी-देहूच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यांवर खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी आणि डोईवर वृंदावन घेऊन निघालेल्या महिला दिसून येत आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये प्रत्येकाच्या मुखातून हरिभक्तीचे सूर निघत आहेत. आळंदी आणि देहू परिसरात आणि पंचक्रोशीत विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या राहुट्या दिसून येत आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असलेल्या वारकरी आणि भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडूनही सज्जता ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.