तालुक्यातील येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण क्षेत्रांमधील ऍलोपॅथिक दवाखान्यांमध्ये अनेक आव्हाने पेलत आरोग्यसेवा बळकट होत आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी व इतरत्र कर्मचारी कशा पद्धतीने मेहनत घेतात, रुग्णांना कशा सेवा उपलब्ध करून देतात इत्यादींची माहिती डॉ.संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तालुक्यातील येवदा येथे स्वयम मल्टीपर्पज फाउंडेशनच्यावतीने संचालित स्वयम अकॅडमीच्या वतीने आज येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक भेट दिली. दरम्यान येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य केंद्राच्या संपूर्ण परिसराची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य केंद्राचे कामकाज कशा पद्धतीने चालते, आरोग्य केंद्रात एकूण किती विभाग आहेत, त्या विभागांची रचना कशा पद्धतीने आहे, रुग्णांना कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, आणीबाणीच्या काळात वैद्यकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करते, सोबतच औषधांची उपलब्धता, विविध प्रकारच्या लसींची उपलब्धता, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत चालणाऱ्या रुग्णउपयोगी विविध उपक्रमांची माहिती सुद्धा वैद्यकीय आरोग्य अधिकारी संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेणाऱ्या स्वयम अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य विभागाशी निगडित विविध प्रश्न सुद्धा डॉ. पाटील यांना विचारले. पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे दिली. यावेळी, स्वयम मल्टीपर्पज फाउंडेशनचे मार्गदर्शक तथा माजी गटशिक्षणाधिकारी संजय वाघमारे,आदी उपस्थित होते.
