कितीही जनावरे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केंद्रीय पातळीवरून विरोधकांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, नितिश कुमार यांनी विरोधकांच्या ऐक्यासाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या बैठकाही पार पडल्या असून आगामी लोकसभा निवडणुकासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधकांच्या या ऐक्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. आशिष देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

आज नागपूर येथे काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. त्यावेळी आशिष देशमुखांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुळात विरोधकांकडे कोणताही चेहराच नाही. नेतृत्व कुणी करावे, यावरूनच त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नाराज झाली आहे. आपण काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. इतर राज्यांतही तशीच स्थिती आहे. ते एकमेकांनाच पाडण्याची तयारी आहे.

“देशात मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. ते पटण्याला रॅली करणार आहेत. फ्लॅशबॅकमध्ये तुम्ही गेलात तर अशीच रॅली २०१९ मध्येही झाली होती. हातात हात घालून फोटो काढले होते. मंचावर जेवढे नेते होते तेवढ्याही जागा लोकसभेमध्ये काँग्रेसच्या निवडून आल्या नाहीत. मंचावर ५५ लोक होते आणि काँग्रेसच्या ४८ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे मी तर यांना आव्हान करतो, तुम्ही एकत्रित येत आहात, एकत्रित लढणार आहात. तुम्हाला मतदान देण्याआधी केवळ एवढंच सांगा की तुमचा एक नेता कोण आहे? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे म्हणणे शब्दश: घेऊ नका. मात्र, ज्याप्रमाणे जंगलात कितीही जनावरे एकत्र आली तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे राजकारणातील वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात.