आता प्रत्येक ट्रकमध्ये एसी अनिवार्य; नितीन गडकरींची मोठी घोषणा

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाढत्या उन्हाळ्यामुळे मोठी घोषणा केली आहे. त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान ट्रकची केबिन वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन गडकरी म्हणाले की, लवकरच ट्रक चालकांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. गडकरी म्हणाले की, देशातील वाहतूक क्षेत्रात चालकाची मोठी भूमिका आहे. भारतामध्ये वाहतूक क्षेत्राचे खूप महत्वाचे योगदान आहे कारण भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि अशा परिस्थितीत वाहतूक क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतातील रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच ट्रक चालकांची कामाची खडतर परिस्थिती आणि रस्त्यावर जास्त वेळ वाहन चालवण्याचा थकवा हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.

अशातच नितीन गडकरी म्हणाले, “आपल्या देशातील काही ड्रायव्हर १२ किंवा १४ तास ट्रक चालवत असतात. तर इतर देशांमध्ये बस आणि ट्रक ड्रायव्हरला वाहन चालवण्यासाठी काही तासांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. आपल्या देशातील ट्रकचालक ४३ ते ४७ अंश तापमानात गाडी चालवतात”. गाडी चालवण्याची कठीण परिस्थिती आणि रस्त्यांची अवस्था यामुळे तासंतास ट्रक चालवणारे चालक थकून जातात. याच कारणाने अनेक अपघातही होतात. म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं आहे.

“मी जेव्हा मंत्री झालो तेव्हाच मी ट्रकमध्ये एसी केबिन सुरू करण्यास इच्छूक होतो. मात्र, काही लोकांनी यामुळे खर्च वाढेल असं म्हणत याला विरोध केला. मात्र, मी या निर्णयाच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे,” असंही नितीन गडकरींनी नमूद केलं.इतर देशांच्या तुलनेत आपला लॉजिस्टिक खर्च 14-16 टक्के आहे. चीनमध्ये रसद खर्च 8-10 टक्के आहे. युरोपीय देशांमध्ये ते 12 टक्के आहे. जर आपल्याला आपली निर्यात वाढवायची असेल तर लॉजिस्टिक खर्च कमी करावा लागेल. असेही गडकरी यांनी म्हटले.