मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाशी संदर्भात ईडीकडून छापेमारी सुरू आहे.
राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याचे वृत्त आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर ईडीकडून ही छापेमारी केली जात असून, आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्याशिवाय संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे. मात्र, अद्याप या नावांना ईडीकडून दुजोरा मिळालेला नाही. ईडीच्या या कारवाईदरम्यान नेमक्या कुणाच्या मुसक्या आवळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असून, राजकीय वर्तुळात या छापेमारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याशी जवळीक असल्यानंच सुजीत पाटकर यांनी लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं कंत्राट मिळवलं. तसेच यात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोपही किरीट सोमय्यांनी केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. बीएमसीचे वरिष्ठ अधिकारी, पुरवठादार आणि शहरात कोविड मशिनरी उभारण्यास मदत करणाऱ्या लोकांच्या आणि इतरांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. तसेच, यामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या ठिकाणांवरही छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त इक्बाल चहल यांचीही यापूर्वी या प्रकरणा संदर्भात ईडीनं चौकशी केली होती.
सुरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय मानले जातात. तसेच ते युवासेनेचे पदाधिकारीदेखील आहेत. विविध निवडणुकांमागे पदड्यामागची गणितं सूरज चव्हाण यांच्याच हाती असतात. मुंबई महानगरपालिका, राज्यसभा आणि परिषदेच्या निवडणुकांमध्ये सूरज चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ही छापेमारी केली जात असल्याचे सांगितले जात आहे.
तर. दुसरीकडे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असणारे सुजित पाटकर यांच्या घरावरही छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून केली आहे. त्यात आता ईडीचीही एन्ट्री झाल्याने अनेक घोटाळेबाजांचे धाबे दणाणले आहेत.
