एकनाथ शिंदे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते! दीपक केसरकरांचा खळबळजनक खुलासा

शिवसेनेतील बंडाला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यानंतर शिवसेनेचा वर्धापन दिनही झाला. शिंदे आणि ठाकरे गटाचा वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, आता वर्षभराने राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी खळबळजनक असा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता. तो यशस्वी झाला नसता तर शिंदेनी गोळी झाडून घेतली असती असं दिपक केसरकर म्हणाले.

दीपक केसरकर म्हणाले, “अस्मितेसाठी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरे वचन द्यायचे आणि तोडायचे. एकनाथ शिंदे यांनी निश्चितपणे उठाव केला. नंतर एकनाथ शिंदेंना वाटलं, ही सर्व लोक माझ्याबरोबर प्रेमाने आली आहे. कारण, शिंदेंचा अपमान झाला, तो दिवस वर्धापनदिनाचा होता.” वर्धापनदिनादिवशीच एक नंबरच्या शिलेदाराचा अपमान केला. शिंदेंना खालच्या दर्जाची वागणूक दिली. एकनाथ शिंदे हे विधिमंडळाचे नेते होते. त्यांचा अपमान का केला? याचं उत्तर दिलं पाहिजे. एकनाथ शिंदे रागवून गेले असते, तर परत येण्याची तयारीही दाखवली होती, असेही दीपक केसरकरांनी सांगितलं.

शिवसेनेतील उठावाबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही असं वाटायला लागलं असतं, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झाली आहे, पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.

दीपक केसरकर म्हणाले, शरद पवार यांनीही बंड केले होते ना? मग पवारांनी केला तो उठाव आणि शिंदेंनी केली ती गद्दारी? असं कसं? मंत्र्यांना भेट मिळत नव्हती, ते काय राजे होते का? तुम्ही तुमच्या घरी राजे, त्यांनी गद्दार बोलणं हे हास्यास्पद आहे अशा शब्दात केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली.