ईडी अ‍ॅक्शन मोडमध्ये, मुंबईनंतर सांगलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी संभंधित बँकेवर ईडीचे छापे

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवरील कारवाईची घटना ताजी असतानाच आता सांगलीतून खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संबंधित असलेल्या राजारामबापू सहकारी बँकेच्या कार्यालयांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. सांगलीसह इस्लामपुरात ईडीने छापे मारले असून पश्चिम महाराष्ट्रातील १४ ठिकाणी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शंभर कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहाराची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्याशी संबंधित असलेल्या बँकांवर धाड पडल्याने राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बँकेच्या कार्यालयासह चार्टर्ड अकाऊंटंटवर देखील ईडीला संशय आहे. सीएच्या मदतीनं काही कंपन्यांनी त्यांच्याकडील पैशांचे कमिशनसाठी संशयास्पद पद्धतीनं अवैध व्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. ईडीला शहरातील मोठमोठ्या कंपन्यांवर संशय आहे.कायदेशीर पैशाचं रोख पैशांमध्ये हव्या त्या पद्धतीनं खर्च जाहीर न करता रुपांतर करण्यात सीएंनी मदत केल्याचा संशय ईडीला आहे. ईडीला त्या रकमेचा वापर लाच देण्यासाठी झाला असाव असा संशय आहे. आर्थिक अनियमिततेच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे.

११ वाहनांमधून ६० अधिकारी या कारवाईसाठी सांगलीत दाखल झाले होते. या पथकासोबत आलेल्या सीआरपीएफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला.यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. शहरातील शासकीय रुग्णालयामागे त्रिकोणी बागेसमोर दिनेश पारेख आणि सुरेश पारेख या व्यापारी भावांचे शेजारीशेजारी बंगले आहेत. दोघेही इलेक्ट्रिक साहित्याचे मोठे व्यापारी आहेत. दोघांच्या घरांवर काल (२३ जून) सकाळी ७ वाजता छापा टाकण्यात आला.

राजाराम सहकारी बँक ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संबंधित आहे. या बँकेच्या मुख्य कार्यालयावर काल (दि.२३ जून) छापेमारी झाली. सांगलीमध्ये ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. दहा वर्ष जुनं हे प्रकरण आहे. या बँकेतून १ हजार कोटी रूपये वळते केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. यामुळे बँकेचे अधिकारी आणि सांगलीतील काही व्यापारीही ईडीच्या रडारवर आहेत.