राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आता सरकारमध्ये सामील होणार आहेत. अजित पवार हे राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासोबत आता अजित पवार हे देखील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील. राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असतील. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे देखील राजभवनावर दाखल झाले आहेत. ते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. छगन भुजबळ यांच्या राजभवनातील फोटो समोर आला आहे. तसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेल हे देखील राजभवनावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर अनेक भाजपचे नेते राजभवनावर उपस्थित असल्याची माहिती आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
मागील काही दिवसांपासून अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवारांनी जाहिररित्या पक्षामध्ये जबाबदारी मिळावी अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी १ जुलैचा अल्टिमेटम देखील दिला होता. मात्र त्यांच्या या मागणीची दखल न घेतल्याने अजित पवारांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे.
