सगळ्या आमदारांनी पवारांचा आशीर्वाद घेतला,पक्ष एकसंध राहण्यासाठी पुन्हा विनंती -प्रफुल्ल पटेल

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरु असलेले धक्कातंत्राचे राजकारण काही केल्या थांबायला तयार नाही. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट फोडून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटत लढाईच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमधील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरु असलेल्या घडामोडींविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण अजित पवार आणि त्यांच्या गटाचे आमदार सोमवारी दुपारी शरद पवार यांच्या भेटीसाठी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.

कालदेखील अजित पवार आणि त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार आपल्या गटाचे सर्व आमदार सोबत घेऊन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. काल अजित पवार गटाचे नेते न सांगता शरद पवार यांच्या भेटीला आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्व मंत्री होते.आज अजित पवारांसोबत जवळपास ३० आमदार याठिकाणी आले आहेत. मात्र, आज अजित पवार हे आधी वेळ घेऊन शरद पवार यांच्या भेटीला आल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार काही वेळापूर्वीच सिल्व्हर ओकवरुन निघून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत.याठिकाणी शरद पवार गटाचे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड ही उपस्थित राहणार आहेत.आता याठिकाणी बैठकीला सुरुवात झाली असून त्यामधून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

आजपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर काल (16 जुलै) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते व आमदार यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी हे देखील उपस्थित होते.यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटेल म्हणाले की, अजित पवार आणि विधीमंडळाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार ज्येष्ठ नेते शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. काल सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, खासदार यांनी भेट घेतली होती. काल रविवार असल्यामुळे सर्व आमदार मतदारसंघात होते. पण, विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यामुळे सर्व आमदार आज उपस्थित होते. त्यामुळे आमदारांना आशीर्वाद मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना भेटायला आलो होतो.

सर्व आमदारांनी शरद पवारांचा आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ रहावा, यासाठी आम्ही काल विनंती केली होती, तशीच विनंती आजही आम्ही केली. पवारसाहेबांनी कालच्याप्रमाणे आजही आमचे म्हणणे ऐकून घेतले. पण, त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या मनात काय आहे, हे मी आज कसं सांगू शकतो, असेही पटेल म्हणाले.