अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 41 हजार कोटींच्या वर पुरवण्या मागण्या सादर

राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे. परंतु पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकूण 41,243.21 कोटींच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर करण्यात आल्या आहेत.

एकूण पुरवणी मागण्यांपैकी रु. 13,091.21 कोटीच्या अनिवार्य, रु. 25,611.38 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत तर रु. 2,540.62 कोटींच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने करण्यात आल्या आहेत. सोबतच रु.41, 243.21 कोटींच्या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा रु. 35,883.31 कोटी एवढा आहे.

जल जीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींसाठी (राज्य हिस्सा)5856 कोटी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सद्यस्थितीत पात्र लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यासाठी 4,000 कोटी.

पुरवणी मागण्या खालील प्रमाणे :

●जल जीवन मिशन-सर्वसाधारण घटक व गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण व सहाय्यिकृत बाबींसाठी (राज्य हिस्सा) 5856 कोटी.

●प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील सद्यस्थितीत पात्र लाभार्थींना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यासाठी 4000 कोटी.


●राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची थकबाकी व चौथा अनुज्ञेय हप्ता अदा करण्यासाठी 3563.16 कोटी.

●मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2100 कोटी.

●मा.लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी 1500 कोटी.

●केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशनच्या अनसूचित जाती घटकातील लाभार्थ्याकरीता राज्य हिस्सा 1415 कोटी.

●15 व्या वित्त आयोगांतर्गत अनुदान देण्यासाठी 1398 कोटी

●केंद्र सरकारकडून राज्य शासनाला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजनेसाठी 1200 कोटी.

●श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरीता 1100 कोटी.

●महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास सवलतमूल्य व अर्थसहाय्याकरिता 1000 कोटी.

●महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी 1000 कोटी.

●नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ( POCRA ) प्रकल्प अंमलबजावणीसाठी बाहय हिस्सा व राज्य हिस्सा 969 कोटी.

●अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र हिस्सा,राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सा 939 कोटी.

●केंद्र पुरस्कृत जल जीवन मिशन योजना (राज्य हिस्सा) (अ. ज. घटक)800 कोटी.

●शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपदान/अंशराशीकरण व 7 वा वेतन आयोग थकबाकीचे हप्ते अदा करणे 798.41कोटी.

●केंद्र शासनाकडून भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी 795.01 कोटी.

●संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी सर्वसाधारण घटकातील लाभार्थ्यांकरीता 600 कोटी.

●राज्यातील लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतक-यांना अनुदान 550 कोटी.

●पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्यासाठी 549.54 कोटी.

●केंद्रीय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरुन काढण्यासाठी 523.23 कोटी.