नितीन गडकरी धमकी प्रकरणाचा संपूर्ण तपास मागणाऱ्या एनआयए च्या अर्जावर उद्या सुनावणी; अफसर पाशाबाबत धक्कादायक माहिती समोर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी आणि खंडणी प्रकरणाचा तपास संपूर्णपणे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे द्यावा, अशी मागणी करणाऱ्या एनआयएच्या अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देऊन खंडणी मागितल्याच्या प्रकरणाचा तपास आणि दोन्ही आरोपी सोपवण्यासाठी एनआयएने नागपूरच्या विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायाधीश सुट्टीवर असल्याने आज सुनावणी झाली नाही. एनआयएला हे प्रकरण त्यांच्या तपासासाठी हवे आहे, शिवाय प्रकरणातील सर्व आरोपी, कागदपत्रेही त्यांना हवी आहेत. नागपुरात (यूएपीए कायद्यांतर्गत) दाखल असलेले दोन्ही प्रकरण मुंबईत स्पेशल कोर्टात हस्तांतरीत करुन घ्यायचे आहे.

अफसर पाशा हा बेळगावच्या जेलमधून लष्कर ये तोयबाचा स्लिपर सेल चालवत होता. लष्कर ये तोयबाच्या स्लिपर सेलची ॲक्टीव्हीटी म्हणून अफसर पाशाच्या सांगण्यावरून जयेश पुजारी याने नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचं समोर आलं आहे. एवढंच नाही तर नागपुरातून गेल्यानंतर अफसर पाशा यानं बंगळूरुमध्ये 2005 साली दहशतवादी हल्ला केला होता अशी माहिती मिळत आहे.

जयेश पुजारीने दोन वेळा नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयात फोन करून धमक्या दिल्या होत्या गडकरी यांच्याकडे 100 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्याला अटक केल्यानंतर पुजारीने बेळगावच्या तुरुंगातूनही नितीन गडकरी यांना ही धमकी दिली होती. या प्रकरणी जयेश पुजारी नागपूर पोलिसांच्या ताब्यात आहे.

अफसर पाशा असे बशीरुद्दीन नूर अहमदचे गुन्हेगारी विश्वातील नाव आहे. तो कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील रहिवासी आहे. अफसर पाशा पीएफआयसह कर्नाटकातील लष्कर-ए-तोयबाचे काम हाताळत होता.कर्नाटकातील लष्कर-ए-तोयबासाठी काम करणारा बशीरुद्दीन नूर अहमद उर्फ ​​अफसर पाशा हा त्यामागचा खरा सूत्रधार आहे. 2003 ढाका बॉम्बस्फोट, 2005 बंगळुरू बॉम्बस्फोट यासह जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पाशा 2006 पासून अटकेत असून 2014 पासून बेळगावी तुरुंगात आहे.