महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. आणखी एक पक्ष लवकरच फुटणार आहे, तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचे घर फुटणार आहे, हे मी वारंवार सांगतोय. आता त्यांच्याकडचं कोण कोण येतंय? याकडेच आमचे लक्ष आहे, असे खळबळजनक विधान शिरसाट यांनी केले आहे.
अजितदादा राष्ट्रवादीला सोडतील हे आम्हाला आधीच माहीत होतं. म्हणून दादा आमच्यासोबत येतील असं मी बोलत होतो. अजितदादांना एका दिवसात महायुतीत आणलं नाही. होमवर्क एका दिवसात होत नाही. अनेक महिन्यापासून त्यावर काम सुरू असतं. सर्व गोष्टींची आधीपासून तयारी करावी लागते, असंही त्यांनी सांगितलं.
आगामी विस्तारात अनेक मंत्र्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आमची चर्चा झाली आहे. अधिवेशनांनंतर विस्तार होईल. महाविकास आघाडीत गोंधळ होता म्हणून ते बाहेर पडले त्यांचा सन्मान ठेवायचा होता. आम्ही घरातले लोक आहोत मंत्री पद आज, उद्या मिळेल. भारत गोगावले भावनात्मक बोलले. चर्चा झाली. ते आता नाराज नाही. मला काही दिलं नाही तरी मुख्यमंत्री आमचे आहे यात समाधान आहे. उठाव करताना सत्तेची पदाची लालसा ठेवली नाही. राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात. 14 मंत्री करायचे आहे ते अधिवेशनांनंतर होईल, असं त्यांनी सांगितलं.
