आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षाकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारविरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनाला वादळी सुरवात झाली आहे. काँग्रेसच्या आणि ठाकरेंच्या या आंदोलनात शरद पवारांसोबतचा एकही आमदार नाही आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटाचे आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र शरद पवार यांच्या गटाचा एकही आमदार पायऱ्यावर उपस्थित नव्हता. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीचे आमदार काय भूमिका घेणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. मात्र या आंदोलनात राष्ट्रवादीचा एकही आमदार सहभागी झाला नाही.
दरम्यान त्यापूर्वी काल अजित पवार गटाच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं या भेटीची जरोदार चर्चा होती. आम्ही शरद पवार यांचे अर्शिवाद घेण्यासाठी आलो होतो, अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
