रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीवर बुधवारी रात्री काळाने घाला घातला अन् काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रात्रीतून दरड कोसळली आणि 16 जणांनी जीव गमावला. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 22 जुलै असणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाबद्दल कोणीही होर्डिंग, बॅनर लावू नये तसेच जाहिरातीदेखील देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. तर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनीही आपला वाढदिवस साजरा न करण्याबाबत सांगितले. दोन्ही नेत्यांचा वाढदिवस 22 जुलैलाच असतो.
आपल्या वाढदिवशी गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम न करता त्यासाठी होणारा खर्च इर्शाळवाडीच्या पुर्वसनासाठी वापरण्याता यावा असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस हा भाजपकडून सेवा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भाजपचे कार्यकर्ते सेवा देणार असल्याची माहिती भाजपचे महाराष्ट्र् प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यावेळी इर्शाळवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणीही वाढदिवस साजरा करु नये, तसंच मोठे होर्डिंग लावू नयेत, याबाबतचे आदेश भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी जाहिरात बाजी फलक आतिषबाजी न करता संपूर्ण महाराष्ट्रात सेवा दिन म्हणून साजरा करणार आहोत अशी माहिती आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या सेवादिनात संकटाला सामोरे जाण्यासाठी पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मिळून काम करणार आहोत. हे संकट दूर होईपर्यंत भाजपचे कार्यकर्ते कार्यरत असतील नेत्रदान रक्तदान शिबिर आणि आरोग्य सेवा पुरवण्याचा संकल्प असेल वृद्धाश्रमात भुकेल्यांना अन्न देणार 22 जुलै 2023 या दिवशी भाजप महाराष्ट्रात 50000 रुग्ण मित्र नेमणार आहे.
