मंत्रालय कक्षाला धमकीचा फोन; एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी

मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची धक्कदायक घटना घडली आहे. फोन करणाऱ्याने एक-दोन दिवसात अतिरेकी कारवाई करण्याची धमकी दिली. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँड लाईनवर काल रात्री 10 वाजता हा फोन आला होता. या फोनमुळे एकच खळबळ माजली असून, मुंबई पोलीस सतर्क झाले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला कांदिवली येथून अटक केली आहे. आरोपीला दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आोरपीने हा फोन का केला? कोणत्या उद्देशाने केला? खरंच काही अतिरेकी कारवाईचा कट आहे की केवळ दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा फोन करण्यात आला? याबाबत मुंबई पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

धमकीच्या फोनमध्ये खरंच काही तथ्य आहे का? याची पडताळणी मुंबई पोलीस करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना देखील धमकीचा फोन आला होता. मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती.मागील काही काळापासून राजकीय नेत्यांना धमकी येण्याची मालिकाच सुरू असताना, आता थेट अतिरेकी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आल्याने, यामुळे खळबळ उडाली आहे. याचा शोध आता घेण्यात येत आहे.

मात्र वारंवार येणाऱ्या अशा धमकीच्या फोनमुळे मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस वेगाने तपासचक्रे फिरवत आहेत. स्वातंत्र दिन जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर या धमकीच्या फोनमुळे पोलीस सतर्क झाले आहेत.