राहुल गांधी यांना राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं का? – नितेश राणे

राहुल गांधी यांचं कालचं भाषण सध्या चर्चेत आहे. तसंच या भाषणादरम्यानची त्यांची कृतीही चर्चेत आली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरुन काल संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आज ठिकठिकाणी भाजपने मोर्चे काढले आहेत. राहुल गांधी यांच्या कृतीवर आक्षेप नोंदवला जात आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबई महिलांनी आंदोलन केलं. तर सिंधुदुर्गात भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

संसदेत काल अमित शहा यांचं ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाला झोंबल्या. त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यात जाणवले. दुसर जे झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस, असे म्हणत नितेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. एका महिला सदस्याला फ्लाईंग किस देणं कितपत योग्य आहे. ज्यांना महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं योग्य वाटत त्याला काय म्हणायचं? राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

राणे म्हणाले की, प्रत्येक वक्त्याला प्रेरणा मिळावी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल भाषण केलं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याला झोंबल्याचे ते म्हणाले. मणिपूर घटनेबाबत शाहांनी अतिशय महत्त्वाची माहिती देशाला दिली. तर, दुसरीकडे राहुल गांधींचे कालचे भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस म्हणावं की संसदेतील भाषण म्हणावं असा प्रश्न पडला असून, हे महाशय भारत जोडो यात्रेमध्ये सगळकडे फ्लाइंग किस देत सगळीकडे फिरत होते.

महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांना भेटणार आहेत.हा मोठा जोक आहे. पत्रकार हल्ल्याबाबत संजय राऊतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांवर टीका करण योग्य आहे का? तुमच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले. संजय राऊतांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.