पुण्यातील अजित पवार भेटीवर स्वतः शरद पवार यांनी राजकीय संभ्रम दूर केला असला तरी, या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अद्याप वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. आमदार बच्चू कडू यांनी या भेटीवरून राजकारणाच्या पुढच्या दिशेबाबत भाकित केलं आहे. शरद पवारही अजित पवारांसोबत येतील आणि महायुती आणखी मजबूत करतील, असं कडू म्हणाले.
बच्चू कडू म्हणाले की, शरद पवारांचे बोलणे आणि प्रत्यक्षात कृती या न समजणाऱ्या गोष्टी आहेत. शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाहीत असा त्यांचा राजकीय कारकिर्दीतला अनुभव आहे. अजित पवार-शरद पवार भेटीतून काय समजावं हे कळत नाही. राष्ट्रवादीत सध्या कुठेही फूट नाही. एक दिसणारा गट तर एक न दिसणारा गट आहे तसेच जे चित्र पाहतोय त्यात मागे म्हटल्याप्रमाणे विरोधी बाकांवरही सत्तेतल्या माणसांना बसावे लागेल असंही बच्चू कडू यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच सध्या संभ्रमात दिसतोय. राष्ट्रवादीत अनिश्चितता आहे. पिक्चरमध्ये कोणी येत नाही. अजितदादा बाहेर पडल्यानंतर जो विरोध व्हायला पाहिजे होता तो दिसत नाही. अजितदादांच्या बॅनरवर पवार साहेबांचे फोटो वापरले जातात. या सगळ्या परिस्थितीमध्ये संभ्रम दिसतोय. त्यामुळे शरद पवार देखील अजितदादांसोबत येऊन महायुती मजबूत करतील.
मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी गेल्या १ वर्षात सर्वाधिक निधी दिला आहे. ठाण्यातील जो प्रकार आहे त्यात जे दोषी असतील त्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी पण फौजदारी खटलेही दाखल करावे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये एका रात्रीत १८ जणांचा मृत्यू झाला त्यावर पत्रकारांनी बच्चू कडू यांना प्रश्न विचारला होता.
