राज्याच्या इतिहासात प्रथमच मंत्री गडचिरोलीतील दुर्गम भागात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने भारावून गेले ग्रामस्थ आणि पोलीस

नक्षलवाद्यांच्या कारवायांमुळे संवेदनशील असलेल्या गडचिरोलीतील दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर एकही मंत्री गेला नव्हता. या भागाला भेट देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेल्या संवादामुळे ग्रामस्थ आणि पोलीस भारावून गेले.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील कोठी कोरनार येथे महाराष्ट्र आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या पुलाचे उदघाटन फडणवीस यांनी केले. राज्याच्या इतिहासात प्रथमच मंत्री पिपली बुरगी येथे आले होते. अद्याप कोणीही मंत्री या ठिकाणी गेला नव्हता.पावसाळ्यात सोळा गावे पूर्णपणेसंपर्कातून तुटत होती. त्यांना या पुलामुळे मोठी सोय होणार आहे. त्यानंतर सूरजागड येथे पोलीस प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांनी केले आणि संवाद साधला. तेथून अहेरीपर्यंत प्रवास करीत पोलीस उपाहारगृह, ग्रंथालय आणि उद्यानाचे उद्घाटन केले. अहेरीतील पोलीस उपमुख्यालय प्राणहिता येथील शहीद स्मारकाला फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

नक्षलविरोधी अभियानात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व शौर्य पुरस्कारप्राप्त पोलीस अधिकारी व जवानांना फडणवीस यांच्या हस्ते प्राणहिता पोलिस उपमुख्यालय येथे प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यासाठी गडचिरोली पोलिसांचे मोठे योगदान आहे. पोलिसांच्या शौर्याची बलिदान दखल केंद्र सरकारने घेतली आहे. त्यांचा दीड पट वेतनाचा मार्ग मोकळा करून दिला असून पुढील आदेशापर्यंत तो बंद होणार नाही. पोलिस दलाला कोणतीच कमतरता भासू देणार नसून राज्य सरकार सदैव सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

फडणवीस यांनी अतिदुर्गम भागातील पाच मोबाईल टॉवरचे ऑनलाइन लोकार्पण केले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून कनेक्टिव्हिटीबाबत विचारपूस केली. त्यामुळे ग्रामस्थ भारावून गेले होते.पोलिस व नक्षल्यांमध्ये नेहमीच धुमश्चक्री होतात.अशावेळी पोलिसांना जीव धोक्यात घालून नक्षल्यांचा सामना करावा लागतो. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी कारवाफा या अतिदुर्गम ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस जवानांशी संवाद साधला. स्थानिक नागरिकांना त्यांनी विविध योजनांची माहिती दिली.