ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आरोप-प्रत्यारोपही सुरू आहेत. अशातच आता राजकारणी मंडळीदेखील या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय भाष्य करत आहेत. नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी उद्योगमंत्री उदय सामंत यानी मोठं वक्तव्य केलं आहे. नितीन देसाई यांचं दुःख काय होतं हे सांगायला आम्ही तोंड उघडलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही असं वक्तव्य सामंत यांनी केलं आहे. दरम्यान, सामंत यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मंत्री उदय सामंत म्हणाले की, नितीन देसाई हे जितके माझ्या जवळचे होते, तितके ते दुसऱ्या कोणाच्याच जवळचे नव्हते. नितीन देसाई जायच्या एक महिना अगोदर मला भेटले होते. ज्या काही गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, त्या कोणालाच सांगितल्या नसतील. कोणाला कळल्या नसतील तर त्या मी सांगतो.नितीन देसाई यांचं दुःख काय होतं हे जर मी बाहेर काढलं तर काही लोकांना रत्नागिरीत तोंड दाखवायला जागा उरणार नाही. त्यामुळे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय गोष्टी करण्यापेक्षा आपण पाच वर्ष काय केलं, गेल्या 7 वर्षात, 9 वर्षात काय केलं हे जनतेला सांगण्याची वेळ आली आहे, दरम्यान, उदय सामंत यांचा नेमका रोख कोणाकडे आहे? हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतू त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.
एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी आम्ही नितीन देसाई यांच्या कंटुंबियांशी चर्चा करणार आहोत.त्यानंतर नितीन देसाईने कर्ज घेतलेल्या फायनान्स कंपनीशीही चर्चा करणार आहोत. यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. या चर्चेत एनडी स्टुडिओ जर सरकारच्या ताब्यात राहिला तर त्यातून मोठी रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच बॉलीवूडला जी जागेच कमतरता भासत आहे, ती या स्टुडिओनिमित्त मुंबईच्या बाहेर उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. याबाबत मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. आता यावर सरकार पातळीवर काय निर्णय होतो, हे य़ेणाऱ्या काळात समोर येणार आहे.
