होय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. पण ती खुर्चीचे रक्षण करण्याकरिता आहे. कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला जागा दाखविण्याकरिता आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले.
शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, आज राज्यात एक मजबूत सरकार आहे. पण त्यानंतरही काहीजण दिवसा स्वप्न पाहत आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर आहे अशी टीका करत आहेत. होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण आम्हाला आमच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे संरक्षण करायचे आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे वाकडी नजर करणाऱ्याला त्याची जागा दाखवण्याचे काम आम्ही दोघे उपमुख्यमंत्री करू.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 तास काम करतात. संवेदनशीलपणे काम करतात. इर्शाळवाडीत दुर्घटना घडली. तिथे प्रशासनाला पोहोचता येत नव्हते, तिथे ते पायपीट करत पोहोचले. शिंदेंच्या कामाची शैली तथा अजित पवार व माझं तुम्हाला माहिती आहे. आम्ही तिघे एकत्रित आल्यामुळे आता आमचा जवाब नाही, असा इशाराही फडणवीस यांनी यावेळी दिला.
