‘इंडिया’ आघाडीत बिघाडी; काँग्रेस-आपमध्ये वादाची ठिणगी

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीची एकजूट बांधण्याचा प्रयत्न होत आहे. तर, दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन्ही पक्षातील तणाव पुन्हा वाढला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेस प्रवक्त्यांकडून दिल्ली लोकसभेतील सातही जागा स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर आपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस नेते अनिल चौधरी म्हणाले की, काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करून लढणार आहे. यावेळी त्यांना दिल्लीत आम आदमी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, आम आदमी पार्टी किंवा युतीबाबत आमची चर्चा झाली नाही, आमचा स्वतःचा मार्ग आहे. असे सांगतानाच त्यांनी अरविंद केजरीवाल सरकारची धोरणे उघड करण्यासाठी आम्ही पोल खोल यात्रेतून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले. तसेच दारू घोटाळ्याप्रकरणी आमच्या तक्रारीवरून अनेक कारवाई करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

‘आप’च्या प्रवक्त्या प्रियंका कक्कर म्हणाल्या की, जर काँग्रेसला दिल्लीत एकटय़ाने लढायचे असेल तर ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यात काही अर्थ नाही. याबद्दलचा अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असेही त्यांनी सांगितले.यानंतर दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी खुलासा केला की, बुधवारची बैठक ही दिल्लीतील आघाडीविषयी चर्चा करण्यासाठी नव्हती आणि त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ‘आप’चा काही समज होऊ शकतो, पण आघाडीविषयी निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून केला जाईल आणि त्यांच्याकडूनच जाहीर केला जाईल. तर माजी आमदार अनिल भारद्वाज म्हणाले की, याविषयी बोलण्यासाठी अलका लांबा यांना अधिकार देण्यात आलेले नाहीत.

दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भाजपा असे तीन प्रमुख पक्ष आहेत.सत्ताधारी पक्षाच्या एनडीए आघाडीला आव्हान देण्यासाठी लोकसभा निवडणुकीसंदर्भात एका व्यासपीठावर आलेल्या विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा समावेश आहे. अशा स्थितीत राजधानीतील सर्व जागांवर काँग्रेसने एकट्याने लढण्याचा घेतलेला निर्णय ‘इंडिया’ आघाडीला धक्का असू शकतो.