राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले. एवढंच नाही तर या गुप्त भेटीवरून काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मोठा दावा करत “शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार अशी भाजपाने अट ठेवली आहे”, असे म्हटले होते. आता याच दाव्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वड्डेटीवारांवर जोरदार निशाणा साधला.
लोकप्रियता मिळवण्यासाठी असे दावे केले जातात, मात्र, वड्डेटीवारांनी अशा प्रकारचा दावा कशाच्या आधारावर केला, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे”, असे राधाकृष्ण विखे म्हणाले. दीड वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. त्यानंतर मागील जुलै महिन्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली होती. आता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षच फुटायचा राहिला आहे. सत्ताधारी गटातील नेत्यांकडून काँग्रेस लवकरच फुटणार असल्याचे दावे केले जात आहेत. राधाकृष्ण विखेंच्या वक्तव्याचीही त्यात भर पडली आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष खरेच फुटणार का, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असून खरीपाचेही काही अंशी क्षेत्र वाया गेले आहे. या पार्श्वभूमीवरच पशुधनाकरिता चार उपलब्ध करुन देण्याचे आवाहन विचारात घेवून अंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नगर आणि मराठवाड्यात फारशी वेगळी परिस्थिती नाही. धरणातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करावे लागेल. या सगळ्या परिस्थितीवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत विस्ताराने चर्चा करेल. अशी माहितीही यावेळी विखेंनी दिली.
