देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे नाहीत. ज्या राज्यात सरकारे आहेत, ती आमदार फोडून आणलेली आहेत, असा हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला खडेबोल सुनावले होते. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘ज्यांना राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोलू नये’ अशा शब्दात बावनकुळे यांनी पवारांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पवारांनी ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही २०२४ मध्ये जनता मोदींना साथ देणार असल्याचे देखील स्पष्टपणे सांगितले.
पवार साहेब तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजप देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात. मोदीजी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला आहे.
समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘ घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदीजी आणि भाजपला साथ देईल. याबाबत आपण निश्चिंत राहावे, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.
”मोदीजी पुन्हा येणार नाहीत असे भाकीत तुम्ही केले पण तुमचे हे भाकीत खरे होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. समाजात द्वेष निर्माण करण्याचे काम कुणी केले हे महाराष्ट्रातील जनतेने तुमचे सरकार असताना पाहिलेय. त्यामुळे मोदीजींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा,” असा सल्लाही बावनकुळे यांनी पवारांना दिला.
