केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. आता आपली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगली मैत्री झाली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार गटाची काल बीड येथे सभा पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
माझी मराठवाड्याची भूमी संतांची भूमी आहे. समतेचा मार्ग आदर्श आहे. बीड जिल्हा ही भूमी कष्टकऱ्यांची भूमी आहे. महायुतीच्या सरकारमधील आम्ही सर्व मंत्री आम्ही लोकांचे काम करण्यासाठी आम्ही करायचो.प्रत्येकाच्या जीवनात राजकीय चढउतार येत असतात. शाहु फुले आंबेडकरांच्या विचारांनीच जाणारे आहोत. आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी आम्ही सर्वजातीधर्मातील लोकांना वाटले पाहिजे की, हे सरकार सर्वांचे आहे.
एक लाख कोटी रुपये लागले तरी चालतील पण पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचे आणि हे पाणी मराठवाड्याला द्यायचा निर्णय आम्ही घेतल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. निवडणुका येतील निवडणुका जातील, पण बीड जिल्ह्यासाठी जे जे करायचे ठरवले ते ते करण्याचा प्रयत्न केल्याचे अजित पवार म्हणाले. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील, विकासाचा बॅकलॉग भरुन काढायचा असेल, राज्यातील साखर कारखानदारी संकटातून बाहेर काढायची असेल काही निर्णय घ्यावे लागतात असेही ते म्हणाले.
आष्टी पाटोदा शिरुर मतदार संघातील प्रश्न सोडवायचे आहेत. मंत्रालयात बसून मीटिंग घेणं आणि काम करणं सूरु आहे.केंद्र आणि राज्य एका विचाराचे असल्याचे अजित पवार म्हणाले. राजकीय जीवनात चढउतार येतात, त्यांना सामोरं जायचं असतं. बीडच्या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की, आम्ही जरी युतीच्या सरकारंमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ असे अजित पवार म्हणाले. मार्चमध्ये सहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मी मांडणार आहे. त्यावेळी बीडसह मराठवाड्याला झुकते माप दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या आता चांगल्या ओळखी झाल्या आहेत. केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्याची आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
