“दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स…”तुम्हाला हे शोभत नाहीत; छगन भुजबळांची शरद पवारांवर टीका

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांनी नुकतीच बीडमध्ये सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी बीडच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत अजित पवार गटाला टार्गेट केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी बीडमध्ये उत्तरसभा घेतली. त्यावेळी अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तुफान बॅटिंग केली. सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आणि जोरदार हल्लाबोल केला आहे.

आमच्यावर सुद्धा ईडीची कारवाई झाली. हा छगन भुजबळ अडीच वर्ष आतमध्ये होता. तुम्ही म्हणता घाबरला म्हणून गेला. हा छगन भुजबळ तुमच्यासोबत 1991 पासून आहे. तुम्हाला जेव्हा काँग्रेसमधून बाहेर काढलं, तेव्हा हा छगन भुजबळ तुमच्यासोबत होता. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. राजकारणात पुढे जायचं असतं, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

काँग्रेसचे मुकुल वासनिक, कलमाडी, माधराव शिंदे, शिला दिक्षित सतत फोन करत होते, भुजबळ तुम्ही दिल्लीला या. पवारांसोबत जाऊ नका, सांगत होते. पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर करतो, असं आश्वासन दिलं. कारण शिवसेना आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेता म्हणून अंगावर घेतलं होतं. एवढं अंगावर घेतलं होतं की घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादाने छगन भुजबळ वाचला, असंही छगन भुजबळ म्हणाले. “काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. दादा म्हणाले दोनवेळा मुख्यमंत्री पद गेलं. दादा असंच असतं राजकारणात”, असंही ते खेदाने म्हणाले.

“साहेब आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचं काय चुकलं? आमच्यावर का हल्ले करताहेत. अमरसिंह पंडितांचं नाव घेऊन काहीतरी बोलता. दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून करायला लागलात? हे तुम्हाला शोभत नाहीत. आम्ही तुमच्याकडून शिकलो, पण असं बोलायला आम्ही शिकलो नाही. पण तुम्हीच असं बोलायला लागलात”, खासगी गोष्टींवर बोलायचं नाही. आता तुम्ही कुठून कुठं आलात. बोलायला गेलं तर खूप आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.