रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पार पडली. यावेळी मुकेश अंबानी यांनी बैठकीला संबोधित करताना भारतामध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता असून भारत ना थांबतो, ना खचतो, ना हरतो असं म्हटलं. मुकेश अंबानी यांनी भाषणाच्या सुरुवातीला चांद्रयान-3 च्या यशाचाही उल्लेख केला. नवीन रिलायन्स भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तसंच रिलायन्सच्या संचालक मंडळात ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांचा समावेश करण्यात येणार आहे. नीता अंबानी बोर्डातून बाहेर पडणार आहेत.
जियो युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून जियोच्या एअर फायबरची आतुरतेनं वाट पाहत होते. आजच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना मुकेश अंबानींनी जियो एअर फायबरबाबत मोठी घोषणा केली आहे. जियोच्या एअर फायबरची प्रतीक्षा संपली आहे. गणेश चतुर्थी म्हणजेच, 19 सप्टेंबर रोजी लॉन्च होणार आहे.’जिओ एअर फायबर’5G नेटवर्क आणि अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान वापरून घर आणि कार्यालयांना वायरलेस ब्रॉडबँड सेवा प्रदान करेल. जियो एअर फायबरच्या लँडिंगमुळे दूरसंचार क्षेत्रात उलथापालथ होण्याचीही शक्यता आहे.
मुकेश अंबानी यांनी रिलायन्स रिटेलबद्दल सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिली. रिलायन्स रिटेलच व्हॅल्यूएशन 2020 मध्ये 4.28 लाख कोटी रुपये होतं. ते वाढून आता, 8.28 लाख कोटी रुपये झालय. रिलायन्स रिटेलने वित्त वर्ष 2023 मध्ये 2,60,364 कोटी रुपयांचा रेवेन्यू मिळवला.कंपनीचा एबिटडा 17,928 कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट 9,181 कोटी रुपये आहे. रिलायन्स रिटेल ग्लोबल टॉप 100 मध्ये एकमात्र भारतीय रिटेलर आहे. जगात वेगाने वाढणाऱ्या रिटेलर्सपैकी एक आहे अशी माहिती मुकेश अंबानी यांनी दिली.
मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, रिलायन्स जिओसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं लक्ष्य ठेवलं आहे. जिओ 5G चा विस्तार जगात सर्वात वेगाने करणारी आमची पहिली कंपनी आहे. 2016 मध्ये 4G लाँच झाला तेव्हा जागतिक कंपन्यांशी करार केला होता. पण 5G चा विस्तार केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत अंतर्गत मोहिमेत केला जाणार आहे.
