राज्यातील सर्व गणेशभक्त आता गणेशोत्सवाची वाट पाहत आहेत. गणेशोत्सवाला प्रारंभ 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी गणेश मंडळांनी तयारी सुरु केली आहे. पुणे आणि मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी देखाव्यांचे काम सुरु केले आहे. पुणे जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीनंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, बैठकी चांगल्या पद्धतीने पार पडली. गणेशभक्तांची सर्वोतोपरी काळजी घेतली जाईल. मेट्रो प्रवास मी पण केला आहे. गणेशोत्सव काळात मेट्रो सकाळी 6 वाजत सुरू होऊन रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अजित पवारांनी दिली.सर्व मिरवणुका वेळेत काढण्यासाठी प्रयत्न असेल. गणेश मंडळांसोबत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्त श्रावण हार्डीकर यांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले. विसर्जन मिरवणूक वेळेवर पार पाडण्यासंदर्भात चर्चा झाली. यंदापासून गणरायाचे विसर्जन वेळेत होण्यासाठी दगडूशेठ गणपती मंडळ दुपारी 4:30 वाजताच मिरवणुकीत सहभागी होणार आहे. तसेच विसर्जन वेळेत होण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याला गणेश मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बैठक घेतली. 7 तारखेला दहीहंडीचा उत्सव आहे. हा सण लोकप्रिय होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत. गोविंदांना विम्याचे कवच आम्ही दिले आहे. गणेश मंडळांशी सकारात्मक चर्चा झाली. मिरवणुका वेळेत पूर्व व्हाव्यात यासाठी मंडळांना सुचना केल्या आहेत. दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक 4: 30 वाजता काढण्यास सांगितलं आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांच्यावरील नाराजीच्या चर्चांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “चंद्रकांतदादांना मुद्दामहून बोलवत नाही असं नव्हे. कधीकधी आमच्या वेळा जुळत नाहीत. पण आम्ही सगळेजण खेळीमेळीने काम करतो. मुख्यमंत्री आणि आमच्यात योग्य समन्वय आहे. पुणेकरांचा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी आज आम्ही बैठकीला आलो आहोत. याचा अर्थ असा नाही की आम्ही त्यांच्यावर नाराज आहोत.”
