कांदा अनुदान शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या या अनुदानात कुणीही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. अनुदान वाटपात काही तांत्रिक अडचणी येत असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले. शेतकरी मदतीपासून वंचित राहिला नको, याबाबत संबंधित यंत्रणेलाही त्यांनी सूचना केल्या.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. त्यानुसार ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. राज्यात फेब्रुवारी २०२३ च्या सुरवातीला कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सहकारी आणि खासगी बाजार समित्या, थेट पणन परवानाधारक अथवा ‘नाफेड’कडे १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ ला विकलेल्या लेट खरीप कांद्याला अनुदान देण्याचा निर्णय सरकारने २७ मार्च २०२३ ला घेतला. क्विंटलला ३५० रुपयांप्रमाणे २०० क्विंटलपर्यंत अनुदान सरकारने जाहीर केले.
सरकारने घोषणा केल्यानुसार ३ ते ३० एप्रिलला शेतकर्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार प्रस्तावाची तपासणी सरकारी लेखापरीक्षक यांच्यातर्फे करण्यात आली. त्यानंतर आता शेतकर्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्याची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू होणार आहे.
सहकार विभागाच्या उपनिबंधक कार्यालयातर्फे जिल्ह्यातील एक लाख ७२ हजार १५२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४३५ कोटी ६१ लाख २३ हजार ५७८ रुपये वर्ग करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या संकेतस्थळावर याद्या ‘अपलोड’ करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. विभागासह बाजार समित्यांचे सचिव आणि कर्मचाऱ्यांनी कामकाज केले.
