महाराष्ट्रातील पेण येथील गणपती लंडनमधील भारतीयांसाठी अंजुषा चौगुले यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये बाल गणेशापासून ते सिंहासनावर आसनस्थ असलेले मोठ्या आकाराचे गणपती आहेत. एका मराठी तरुणीने अगदी पेण सारखेच गणेश विक्रीचे मराठीत फलक लावत त्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केलेली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
लंडन येथील वेंबली भागात मराठमोळ्या अंजुषा चौगुले यांनी गणेश विक्री स्टॉल सुरू केला आहे. या स्टॉलला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.कोणाच्याही आहारी न जाता स्वतंत्रपणे हा उपक्रम एका मराठी तरुणीने लंडन येथे सुरू केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी अंजुषा चौगुले यांचे कौतुक केले. मुंबईत देखील त्या हेच काम करत असतात त्यांना तिथे देखील संपर्क करता येईल. त्यांच्या या सेवेचा लाभ सर्व गणेशभक्तांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.
अंजुषा चौगुले यांनी ‘विघ्नहर्ता गणेश’ या नावाची संस्था सुरू केली आहे. त्यामार्फत भारत आणि युरोपमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची त्या विक्री करतात. पेण येथील कारागिरांनी पारंपरिक पद्धतीने शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणेश मूर्तींचे लंडनमधील हे पहिले पॉप अप स्टोअर ट्रेडर वेम्बली येथे सुरू केले आहे.
अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळाची लंडनमधील महाराष्ट्र मंडळाला भेट
संपूर्ण इंग्लंडमध्ये महाराष्ट्राचे अनेक मंच आहेत मात्र लंडन महाराष्ट्र मंडळाला शंभर वर्षाची परंपरा असून त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेले आहे. त्यामुळे मला महाराष्ट्र भवनच्या या वास्तूत येताना विशेष आनंद वाटत असल्याची भावना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स् आणि इंग्लंडच्या अभ्यास दौऱ्यावर असून 2 सप्टेंबर रोजी अभ्यास दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात युरोपमधील मराठी संस्कृतीचा केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र मंडळास या शिष्टमंडळाने भेट देऊन संवाद साधला.
यादरम्यान, डॉ. गोऱ्हे यांनी या अभ्यास दौऱ्याचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की, महाराष्ट्र विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी कृषी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवर मुद्दे मांडत असतात. या प्रतिनिधींना त्यांच्या मतदारसंघात या मुद्द्यांवर काम करताना अधिक सोपं व्हावं किंवा अधिक सक्षमीकरण व्हावं हा त्याचा हेतू आहे. त्याचप्रमाणे अभ्यासामधून अधिक अभ्यास व्हावा आणि आपल्या कामांना अधिक चालना देता यावी, हा दौऱ्याचा हेतू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
शाश्वत विकासाबाबत जर्मनी, नेदरलँडस् आणि लंडन येथील सरकार काम करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. शाश्वत विकासाची एकूण 17 उद्दिष्टे आहेत. यातील अनेक मुद्द्यांवर महाराष्ट्र सरकार काम करत आहे. सर्व युरोपात अन्नप्रक्रियेच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना कसा फायदा होऊ शकतो याबाबत मुद्दे ठळकपणे समोर आले. परंतु त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना यासंदर्भात जे निर्णय झाले आहेत त्यांची माहिती होणे आवश्यक असल्याचे येथील भारतीय दूतावासातील झालेल्या चर्चेत समोर आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
