मराठा आरक्षणाबाबत बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात आली. लाठीचार्ज, अश्रूधूर याचा वापर करण्यात आला. ही दुर्दैवी घटना आहे. बळाचा वापर करण्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. बळाचा वापर करण्याचं कोणतही कारण नव्हतं. त्यामुळे यात जे जखमी झाले आहेत, शासनाच्या वतीने मी त्यांची क्षमा मागतो. याची उच्चस्तरीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, जालन्यातील घटनेची उच्च चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सरकार दोषींवर नक्कीच कारवाई करेल. दरम्यान, या घटनेवरून काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी होते. काही तर म्हणाले, लाठीहल्ल्याचा आदेश मंत्रालयातून दिला गेला. अशा प्रकारचे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, लाठीहल्ला करण्याचे अधिकार हे एसपी, डीवायएसपी लेव्हलच्या अधिकाऱ्यांनाच असतात. त्यामध्ये मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नसते.
माझ्या आधीच्या सत्तेच्या काळात पाच हजार आंदोलने झाली. तेव्हा कधीच बळाचा वापर केला नव्हता. आता बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे, जखमी झाले आहे. त्यांची मी क्षमा याचना करतो. क्षमा मागतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. या घटनेचं राजकारण होणं योग्य नाही. काही नेत्यांनी तो प्रयत्न केला. हे अत्यंत दुर्दैवी आहे. जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले असं चुकीचं वातावरण निर्माण करण्यात आल्याचा दावाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
निष्पाप ११३ गोवारी पोलिसांच्या हल्ल्यात मारले गेले त्यावेळी मंत्रालयातून आदेश आला होता. तसेच मावळला शेतकरी गोळीबारात मृत्यूमुखी पडले त्यावेळी ते आदेश कुणी दिले होते का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते आदेश दिले होते का? तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते? मग त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला नाही? सरकार हे करतंय हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे जालन्याला गेले होते आणि त्यांचं भाषण मी ऐकलं, त्यांनी सांगितलं की याच्यावर लगेच वटहुकूम काढा. ५ मे २०२१ पासून एक वर्ष, एक महिना तुम्ही मुख्यमंत्री होतात तर मग यावर तुम्ही वटहुकूम का काढला नाहीत? निव्वळ राजकारण करायचं हा सगळा उद्योग आहे. उद्धव ठाकरे जात होते तेव्हा राजेश टोपेंना काय सर्कस करावी लागली ते सगळ्यांना माहित आहे त्यावर मी बोलणार नाही. आमच्या काळात आम्ही ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या होत्या असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
